Sunday, 30 December 2012


भारतीय नागरिकाचा खून वर्णद्वेषातून
वृत्तसंस्था
      न्यूयॉर्क - सब-वे स्टेशनवर उभ्या असलेल्या सुनंदो सेन या भारतीय वंशाच्या नागरिकाला रेल्वेखाली ढकलून दिल्याप्रकरणी एका 31 वर्षीय अमेरिकन स्त्रीला पोलिसांनी अटक केली आहे. वर्णद्वेषातून खून केल्याचा गुन्हा या महिलेच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. हिंदू आणि मुस्लिम व्यक्तींचा आपण द्वेष करीत असून, त्या द्वेषातूनच सेन यांना रेल्वेखाली ढकलले असल्याचे अटक करण्यात आलेल्या महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
      इरिका मेनेंडेझ असे या महिलेचे नाव असून, ती क्वीन्स येथील रहिवासी आहे. वर्णद्वेषातून सुनंदो सेन या 46 वर्षीय भारतीयाच्या खुनाला जबाबदार ठरल्याचा गुन्हा इरिकाच्या विरोधात दाखल झाला आहे. या महिलेला क्वीन्स येथील न्यायालयासमोर हजर केले जाणार असून, या प्रकरणी ती दोषी ठरल्यास 25 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद अमेरिकेतील कायद्यात आहे.
      क्वीन्स येथे राहणाऱ्या सेन यांनी कोलंबिया विद्यापीठाजवळ एक दुकान सुरू केले होते. सेन अविवाहित होते. तसेच, त्यांच्या माता-पित्याचे निधन झालेले आहे. सेन यांच्या मृत्यूबद्दल भारतातील त्यांच्या नातेवाइकांना कळविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इरिका हिने 27 डिसेंबर रोजी क्वीन्स रेल्वेस्थानकावर गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या सेन यांना स्टेशनात प्रवेश करणाऱ्या गाडीखाली ढकलले होते. रेल्वेखाली चिरडून सेन यांचा मृत्यू झाला होता. सब-वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी पळून जाणाऱ्या इरिकाची छायाचित्रे टिपली होती. घटनेनंतर दोन दिवसांनी एका नागरिकाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी इरिकाला ताब्यात घेतले.

No comments:

Post a Comment