Thursday, 20 December 2012


लंडन 
      अमेरिकेसारख्या महासत्तेला "विकीलिक्‍स'च्या माध्यमातून हादरे दिल्यानंतर आता "पुढील वर्षी जगातील प्रत्येक देशाची गोपनीय कागदपत्रे जाहीर करू' असा इशारा "विकीलिक्‍स'चे संस्थापक ज्युलियन असांजे यांनी दिला आहे. जवळपास सर्व देशांना फटका बसेल, अशी एक लाखांहून अधिक गोपनीय कागदपत्रे "विकीलिक्‍स'कडे असल्याचे असांजे यांनी इक्‍वेडोरच्या दूतावासातून केलेल्या भाषणात सांगितले.

      असांजे यांच्यावर स्वीडनमध्ये बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी गेले सहा महिने असांजे यांनी इक्‍वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला आहे. याच दूतावासाच्या गच्चीतून असांजे यांनी भाषण केले. ते म्हणाले, ""यंदाचे वर्ष सीरियाविषयीची गोपनीय कागदपत्रे खुली करण्याबरोबरच इतर घडामोडींमुळे धावपळीचे होते. पुढील वर्षीही आपण सगळे असेच व्यस्त असू. एक लाखांहून अधिक गोपनीय कागदपत्रे खुली करण्याची तयारी "विकीलिक्‍स'मध्ये सुरू आहे. याचा फटका जगातील प्रत्येक देशाला बसेल.''

      राजकीय आश्रय देणाऱ्या इक्‍वेडोरचे आभार मानत असांजे यांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली. ""खरी लोकशाही "व्हाइट हाउस'मध्ये नाहीच. ताहिरीरपासून लंडनपर्यंत सत्यासाठी लढा देणारी सामान्य जनता म्हणजेच खरी लोकशाही आहे,'' असे असांजे म्हणाले. असांजे यांनी याआधी 19 ऑगस्ट रोजी समर्थकांशी जाहीर संवाद साधला होता.

No comments:

Post a Comment