Monday, 24 December 2012


चीनवर झाला असता अमेरिकेचा हल्ला.....
वॉशिंग्टन 
(वृत्तसंस्था)
         १९६२ मध्ये चीनने भारताचा पराभव केल्यानंतर अमेरिका चीनवर अत्यंत संतप्त झाली होती व चीनने पुन्हा असे कृत्य केल्यास चीनवर अण्वस्त्र हल्ला करण्याचा अमेरिकेचा विचार होता. कम्युनिस्ट चीनकडून भारताचा पराभव होऊ नये, असे अमेरिकेला वाटत होते. 
         अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी ९ मे १९६३ रोजी आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. चीनकडून भारताचा पराभव होता कामा नये, चीनला चांगलाच धडा शिकवण्याची गरज असून, गरज पडल्यास चीनवर अण्वस्त्रांचा मारा करावा, असा निर्णय दिला होता. आपण इस्रायल व सौदी अरेबियाला मदत करतो, त्याचबरोबर आपल्याला भारताला हमी दिली पाहिजे आणि गरज पडली तर तिचे पालन केले पाहिजे. चीनला भारताचा पराभव करू देता कामा नये, त्यासाठी आपण भारताला मदत केली पाहिजे, असे केनेडी यांनी म्हटले होते. आपण दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाममधून बाहेर पडू आणि भारताला मदत करू. चीनने परत भारताची कुरापत काढली तर त्यावेळी आपण योग्य तो निर्णय घेऊ, असे केनेडी यांनी या बैठकीत सांगितले होते. व्हाईट हाऊसमधील या बैठकीत तत्कालीन संरक्षण मंत्री रॉबर्ट मॅकन्मारा, सुरक्षा दल प्रमुख जनरल मॅक्सवेल डेवनपोर्ट, मॅक्स टेलर उपस्थित होते, असे या पुस्तकात म्हटले आहे. जुलै १९६२ मध्ये केनेडी यांनी ओव्हल ऑफिसमध्ये छुपी रेकॉर्डिंग यंत्रणा बसविली होती. ओव्हल ऑफिसमध्ये होणार्‍या बैठकीतील संवांदाचे व निर्णयांचे अचूक रेकॉर्डिंग व्हावे यासाठी ही सोय करण्यात आली होती.
       ‘लिसनिंग इन : द सिक्रेट व्हाईट हाऊस रेकॉर्डिंग्ज ऑफ जॉन एफ केनेडी’ या पुस्तकात ही माहिती देण्यात आली आहे. टेड विडमर आणि कॅरोलिन केनेडी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. यात केनेडींची भाषणे व व्हाईट हाऊसमधील बैठकीतील संवादांचे संकलन आहे.

No comments:

Post a Comment