Sunday, 30 December 2012


भारतीय नागरिकाचा खून वर्णद्वेषातून
वृत्तसंस्था
      न्यूयॉर्क - सब-वे स्टेशनवर उभ्या असलेल्या सुनंदो सेन या भारतीय वंशाच्या नागरिकाला रेल्वेखाली ढकलून दिल्याप्रकरणी एका 31 वर्षीय अमेरिकन स्त्रीला पोलिसांनी अटक केली आहे. वर्णद्वेषातून खून केल्याचा गुन्हा या महिलेच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. हिंदू आणि मुस्लिम व्यक्तींचा आपण द्वेष करीत असून, त्या द्वेषातूनच सेन यांना रेल्वेखाली ढकलले असल्याचे अटक करण्यात आलेल्या महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
      इरिका मेनेंडेझ असे या महिलेचे नाव असून, ती क्वीन्स येथील रहिवासी आहे. वर्णद्वेषातून सुनंदो सेन या 46 वर्षीय भारतीयाच्या खुनाला जबाबदार ठरल्याचा गुन्हा इरिकाच्या विरोधात दाखल झाला आहे. या महिलेला क्वीन्स येथील न्यायालयासमोर हजर केले जाणार असून, या प्रकरणी ती दोषी ठरल्यास 25 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद अमेरिकेतील कायद्यात आहे.
      क्वीन्स येथे राहणाऱ्या सेन यांनी कोलंबिया विद्यापीठाजवळ एक दुकान सुरू केले होते. सेन अविवाहित होते. तसेच, त्यांच्या माता-पित्याचे निधन झालेले आहे. सेन यांच्या मृत्यूबद्दल भारतातील त्यांच्या नातेवाइकांना कळविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इरिका हिने 27 डिसेंबर रोजी क्वीन्स रेल्वेस्थानकावर गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या सेन यांना स्टेशनात प्रवेश करणाऱ्या गाडीखाली ढकलले होते. रेल्वेखाली चिरडून सेन यांचा मृत्यू झाला होता. सब-वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी पळून जाणाऱ्या इरिकाची छायाचित्रे टिपली होती. घटनेनंतर दोन दिवसांनी एका नागरिकाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी इरिकाला ताब्यात घेतले.

Wednesday, 26 December 2012


लादेननेही दिली होती लाच.......
इस्लामाबाद 
   
      भ्रष्टाचाराची समस्या ही विश्‍वरुपी झालेली आहे. संपूर्ण जगात दहशत पसरविणारा अल कईदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनदेखील यातून सुटू शकला नसल्याची बाब त्यानेच लिहीलेल्या रोजनिशीतून उघड झाली आहे. पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे घर बांधण्यासाठी तलाठय़ाला (पटवारी) चक्क ५0 हजार रुपयांची लाच द्यावी लागल्याचे त्याने डायरीत नमूद केले आहे.
अबोटाबाद येथे गतवर्षी २ मे रोजी अमेरिकेच्या नेव्ही सील्स कमांडोंनी ओसामा बिन लादेनचा खात्मा केला. अबोटाबाद येथेच पाकिस्तानी लष्कराची प्रशिक्षण अकादमीही आहे. त्या शहरात पाकच्या आजी-माजी सुरक्षा अधिकार्‍यांचे मोठय़ा प्रमाणात वास्तव्य आहे. अशा ठिकाणी ओसामा अखेरच्या काळात गुप्तपणे वास्तव्य करून होता. तेथे त्याने १४ फूट उंचीची संरक्षक भिंत असलेली ३ मजली हवेली बांधली होती. ही हवेली बांधण्यास त्याला स्थानिक तलाठय़ाला चक्क ५0 हजार रुपयांची लाच द्यावी लागली होती.
      पाकिस्तान सरकारने ती हवेली आता पाडली आहे. तेथे सापडलेल्या १ लाख ३७ हजार कागदपत्रांमध्ये रोजनिशीही सापडली. त्यातील एका नोंदीनुसार ओसामाने लाच दिली होती, असे उघड झाले आहे.
लादेनचे पाकमधील वास्तव्य व त्याच्याविरुद्ध अमेरिकेने केलेली कारवाई यासंबंधी न्यायालयीन चौकशी आयोगाने तेथील सरकारी यंत्रणांच्या त्रुटींवर बोट ठेवले आहे.
त्यात या मुद्याचाही समावेश असल्याचे जंग या वर्तमानपत्राने म्हटले आहे. हा अहवाल पाक सरकारपुढे अद्याप मांडला गेलेला नाही आणि तो उघड करावा की नाही, याबाबत अधिकार्‍यांत दुमत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
      ओसामाला पाकिस्तानी महसूल खात्याच्या अधिकार्‍यांची लाचखोरी ठाऊक होती. परंतु वास्तव्याबाबत गुप्तता पाळण्यासाठी ओसामाही नाईलाजास्तव तलाठय़ाला लाच द्यावी लागल्याचे स्पष्ट होत आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलाने त्या तलाठय़ाला अटक केली आहे. पण ज्याच्याकडून लाच घेतली तो लादेन असल्याचे आपल्याला माहित नव्हते, असे त्याने स्पष्ट केले आहे.

Monday, 24 December 2012


चीनवर झाला असता अमेरिकेचा हल्ला.....
वॉशिंग्टन 
(वृत्तसंस्था)
         १९६२ मध्ये चीनने भारताचा पराभव केल्यानंतर अमेरिका चीनवर अत्यंत संतप्त झाली होती व चीनने पुन्हा असे कृत्य केल्यास चीनवर अण्वस्त्र हल्ला करण्याचा अमेरिकेचा विचार होता. कम्युनिस्ट चीनकडून भारताचा पराभव होऊ नये, असे अमेरिकेला वाटत होते. 
         अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी ९ मे १९६३ रोजी आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. चीनकडून भारताचा पराभव होता कामा नये, चीनला चांगलाच धडा शिकवण्याची गरज असून, गरज पडल्यास चीनवर अण्वस्त्रांचा मारा करावा, असा निर्णय दिला होता. आपण इस्रायल व सौदी अरेबियाला मदत करतो, त्याचबरोबर आपल्याला भारताला हमी दिली पाहिजे आणि गरज पडली तर तिचे पालन केले पाहिजे. चीनला भारताचा पराभव करू देता कामा नये, त्यासाठी आपण भारताला मदत केली पाहिजे, असे केनेडी यांनी म्हटले होते. आपण दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाममधून बाहेर पडू आणि भारताला मदत करू. चीनने परत भारताची कुरापत काढली तर त्यावेळी आपण योग्य तो निर्णय घेऊ, असे केनेडी यांनी या बैठकीत सांगितले होते. व्हाईट हाऊसमधील या बैठकीत तत्कालीन संरक्षण मंत्री रॉबर्ट मॅकन्मारा, सुरक्षा दल प्रमुख जनरल मॅक्सवेल डेवनपोर्ट, मॅक्स टेलर उपस्थित होते, असे या पुस्तकात म्हटले आहे. जुलै १९६२ मध्ये केनेडी यांनी ओव्हल ऑफिसमध्ये छुपी रेकॉर्डिंग यंत्रणा बसविली होती. ओव्हल ऑफिसमध्ये होणार्‍या बैठकीतील संवांदाचे व निर्णयांचे अचूक रेकॉर्डिंग व्हावे यासाठी ही सोय करण्यात आली होती.
       ‘लिसनिंग इन : द सिक्रेट व्हाईट हाऊस रेकॉर्डिंग्ज ऑफ जॉन एफ केनेडी’ या पुस्तकात ही माहिती देण्यात आली आहे. टेड विडमर आणि कॅरोलिन केनेडी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. यात केनेडींची भाषणे व व्हाईट हाऊसमधील बैठकीतील संवादांचे संकलन आहे.

Friday, 21 December 2012


                                          ५० वर्षांत मानवाचे क्लोनिंग शक्य

लंडन 
       नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा विश्वास
     
        येत्या ५० वर्षांत मानवाचा क्लोन तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश येईल, असा विश्वास यंदाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेले शास्त्रज्ञ सर जॉन गर्डन यांनी व्यक्त केला आहे. १९९६मध्ये क्लोनिंग तंत्रज्ञानाने डॉली या मेंढीची यशस्वीरित्या निर्मिती करणाऱ्या एडिंबरोमधील शास्त्रज्ञांच्या यशामध्ये सर जॉन गर्डन यांनी पन्नास आणि साठच्या दशकात बेडकांच्या क्लेनिंगवर केलेल्या प्रयोगांचे मोठे योगदान होते. संपूर्ण मानवाचे क्लोनिंग करण्याआधी नैतिकतेच्या अनेक मुद्द्यांना तोंड द्यावे लागणार असले, तरी हे तंत्रज्ञान वैद्यकीयदृष्ट्या उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्व चिंता दूर होतील, असा विश्वास तज्ज्ञांना वाटत आहे.
      या संशोधनामुळे अपघातात मूल गमावलेल्या पालकांना आपल्या मुलासारखे मूल मिळू शकेल. मात्र क्लोनिंगद्वारे निर्मिती केलेल्या बहुसंख्य प्राण्यांमध्ये नंतर दोष निर्माण झाले आहेत.  ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मानवाचे क्लोनिंग करण्याआधी या तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात सुधारणा करणे आवश्यक आहे, असे गर्डन यांनी म्हटले आहे.

Thursday, 20 December 2012


लंडन 
      अमेरिकेसारख्या महासत्तेला "विकीलिक्‍स'च्या माध्यमातून हादरे दिल्यानंतर आता "पुढील वर्षी जगातील प्रत्येक देशाची गोपनीय कागदपत्रे जाहीर करू' असा इशारा "विकीलिक्‍स'चे संस्थापक ज्युलियन असांजे यांनी दिला आहे. जवळपास सर्व देशांना फटका बसेल, अशी एक लाखांहून अधिक गोपनीय कागदपत्रे "विकीलिक्‍स'कडे असल्याचे असांजे यांनी इक्‍वेडोरच्या दूतावासातून केलेल्या भाषणात सांगितले.

      असांजे यांच्यावर स्वीडनमध्ये बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी गेले सहा महिने असांजे यांनी इक्‍वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला आहे. याच दूतावासाच्या गच्चीतून असांजे यांनी भाषण केले. ते म्हणाले, ""यंदाचे वर्ष सीरियाविषयीची गोपनीय कागदपत्रे खुली करण्याबरोबरच इतर घडामोडींमुळे धावपळीचे होते. पुढील वर्षीही आपण सगळे असेच व्यस्त असू. एक लाखांहून अधिक गोपनीय कागदपत्रे खुली करण्याची तयारी "विकीलिक्‍स'मध्ये सुरू आहे. याचा फटका जगातील प्रत्येक देशाला बसेल.''

      राजकीय आश्रय देणाऱ्या इक्‍वेडोरचे आभार मानत असांजे यांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली. ""खरी लोकशाही "व्हाइट हाउस'मध्ये नाहीच. ताहिरीरपासून लंडनपर्यंत सत्यासाठी लढा देणारी सामान्य जनता म्हणजेच खरी लोकशाही आहे,'' असे असांजे म्हणाले. असांजे यांनी याआधी 19 ऑगस्ट रोजी समर्थकांशी जाहीर संवाद साधला होता.

Wednesday, 19 December 2012



आयर्लंड करणार गर्भपात कायदेशीर 
लंडन
            मातेच्या जीवाला धोका असल्याने गर्भपात केल्यास आयर्लंडमध्ये आता तो कायदेशीर ठरणार आहे. तसा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे.

          " गर्भपात हा फौजदारी गुन्हा ठरविणारा कायदा रद्द करण्याचा निर्णय  सरकारने घेतला आहे. गर्भामुळे जीवाला धोका  होउ शकतो, असे वाटल्यास डॉक्टर गर्भपात करु शकतील"                                            

                                                                                         -डॉ. जेम्स रिली, आरोग्यमंत्र 

          गर्भपाताला परवानगी न मिळाल्यामुळे सविता हलप्पनवार नावाच्या भारतीय महिलेचा २८ ऑक्टोबर रोजी आयर्लंडमध्ये मृत्यु झाला होता.आयर्लंड हा कॅथॉलिक देश आहे. त्यामुळे गर्भपाताला परवानगी देता येत नाही, असे सांगुन सविताला रुग्णालयात मरु देण्यात आले होते. त्यावरुन आयर्लंड सरकारवर सर्व बाजुनी टीकेचे झोड उठली होती. यामुळे आता मर्यादित स्वरुपात  गर्भपाताला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. आयर्लंडमधील गर्भपातविरोधी कायदा संपूर्ण युरोपातील सर्वाधिक कडक कायदा असल्याचे मानले जाते.




Tuesday, 18 December 2012


पाक पोलिओ मोहिमेतील पाच कार्यकर्त्यांची हत्या
पीटीआय
कराची
          पाकिस्तानमधील पोलिओ निर्मूलन अभियान पाच कार्यकर्त्यांची निघृण हत्या
करण्यात आली. कराची शहराच्या विविध भागात आणि पेशावरमध्ये मंगळवारी
झालेल्या या भीषण हत्याकांडात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एका १४ वर्षाच्या
मुलीचा समावेश आहे.
         यातील पहिला हल्ला गुलशन-ए-बुनीर भागात नसीम आणि कानीझ या
महिला कर्मचारी पोलिओ बुथची व्यवस्था पाहात असताना झाला. त्यात महिला
जागीच ठार झाल्या. त्यानंतर अर्ध्या तासातच ओरंगी भागात अज्ञात बंदुकधारी
लोकांनी एका महिला आणि एका पुरूष पोलिओ कर्मचारीला ठार केले. सोमवारी
एका पोलिओ निर्मूलन अभियान  कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली.  मृतांची
एकुण आकडा सहा झाला आहे.
        या घटनांनंतर जागतिक आरोग्य संघटनेने तातडीने पोलिओ निर्मूलन अभियान  स्थगित केले.
        अतिरेक्यांचा या मोहिमेस प्रथमपासुन तीव्र विरोध आहे.