Wednesday, 26 December 2012


लादेननेही दिली होती लाच.......
इस्लामाबाद 
   
      भ्रष्टाचाराची समस्या ही विश्‍वरुपी झालेली आहे. संपूर्ण जगात दहशत पसरविणारा अल कईदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनदेखील यातून सुटू शकला नसल्याची बाब त्यानेच लिहीलेल्या रोजनिशीतून उघड झाली आहे. पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे घर बांधण्यासाठी तलाठय़ाला (पटवारी) चक्क ५0 हजार रुपयांची लाच द्यावी लागल्याचे त्याने डायरीत नमूद केले आहे.
अबोटाबाद येथे गतवर्षी २ मे रोजी अमेरिकेच्या नेव्ही सील्स कमांडोंनी ओसामा बिन लादेनचा खात्मा केला. अबोटाबाद येथेच पाकिस्तानी लष्कराची प्रशिक्षण अकादमीही आहे. त्या शहरात पाकच्या आजी-माजी सुरक्षा अधिकार्‍यांचे मोठय़ा प्रमाणात वास्तव्य आहे. अशा ठिकाणी ओसामा अखेरच्या काळात गुप्तपणे वास्तव्य करून होता. तेथे त्याने १४ फूट उंचीची संरक्षक भिंत असलेली ३ मजली हवेली बांधली होती. ही हवेली बांधण्यास त्याला स्थानिक तलाठय़ाला चक्क ५0 हजार रुपयांची लाच द्यावी लागली होती.
      पाकिस्तान सरकारने ती हवेली आता पाडली आहे. तेथे सापडलेल्या १ लाख ३७ हजार कागदपत्रांमध्ये रोजनिशीही सापडली. त्यातील एका नोंदीनुसार ओसामाने लाच दिली होती, असे उघड झाले आहे.
लादेनचे पाकमधील वास्तव्य व त्याच्याविरुद्ध अमेरिकेने केलेली कारवाई यासंबंधी न्यायालयीन चौकशी आयोगाने तेथील सरकारी यंत्रणांच्या त्रुटींवर बोट ठेवले आहे.
त्यात या मुद्याचाही समावेश असल्याचे जंग या वर्तमानपत्राने म्हटले आहे. हा अहवाल पाक सरकारपुढे अद्याप मांडला गेलेला नाही आणि तो उघड करावा की नाही, याबाबत अधिकार्‍यांत दुमत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
      ओसामाला पाकिस्तानी महसूल खात्याच्या अधिकार्‍यांची लाचखोरी ठाऊक होती. परंतु वास्तव्याबाबत गुप्तता पाळण्यासाठी ओसामाही नाईलाजास्तव तलाठय़ाला लाच द्यावी लागल्याचे स्पष्ट होत आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलाने त्या तलाठय़ाला अटक केली आहे. पण ज्याच्याकडून लाच घेतली तो लादेन असल्याचे आपल्याला माहित नव्हते, असे त्याने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment